संग एक
स्थळ : दुर्गा, गूड लक, एस. एम. जोशी ब्रिज, किंवा जिथे आपण खरोखरच बौद्धिक गप्पा मारतो असं प्रत्येकाला वाटतं ती जागा - एखादा बार
वेळ : चार मित्र एकत्र येतील ती (थोडक्यात पुण्यातली कोणतीही)
पुण्यातल्या कोणत्याही तरुणांप्रमाणे स्वतःला इंटलेक्च्युअल समजणारे तरुण गप्पा मारत आहेत. विषय तेंव्हाचा (आणि आत्ताचाही) फेव्हरिट - राज ठाकरे! "काहीही होत नाही रे असल्या मारामार्यांनी, कोणताही ठोस मुद्दा नाही त्याच्याकडे. ग्लोबलायझेशनच्या काळात हा आपला, तो परका असं नाही रे करता येत. आता आपल्यालाही आता चान्स मिळाला तर डॉलर्स सोडून आपण तरी कशाला इथे कुजत पडू... बाळासाहेब ठाकरेंना इतक्या वर्षात नाही जमलं ते हा काय करणार? मतं मिळवायचे खेळ आहेत रे सगळे..."
प्रसंग दोन
स्थळ : दुर्गा, गूड लक, एस. एम. जोशी ब्रिज, किंवा जिथे आपण खरोखरच बौद्धिक गप्पा मारतो असं प्रत्येकाला वाटतं ती जागा - एखादा बार
वेळ : चार मित्र एकत्र येतील ती (थोडक्यात पुण्यातली कोणतीही)
विषय आता 'नेहमीचाच यशस्वी' म्हणता येईल असा- अर्थातच राज ठाकरे. "यार, काहीही म्हण, पण राजनी करून दाखवलं. या लोकांना हीच भाषा कळते. आतापर्यंत मराठी पेपरमध्ये रेल्वे भरतीच्या जाहिराती येत होत्या का? कायदा होता पण दुकानांवर मराठी पाट्या लावायला राज ठाकरेच लागला ना..."
प्रसंग तीन
स्थळ : दुर्गा, गूड लक, एस. एम. जोशी ब्रिज, किंवा जिथे आपण खरोखरच बौद्धिक गप्पा मारतो असं प्रत्येकाला वाटतं ती जागा - एखादा बार
वेळ : चार मित्र एकत्र येतील ती (थोडक्यात पुण्यातली कोणतीही)
विषय आता रोजचाच म्हणता येईल असा - राज ठाकरे. "बास झालं. किती वेळा त्याच त्याच लोकांना मत द्यायचं? आपण तर या वेळेस राजला मत देणार. एकटा माणूस तर आहे, जो यूथचा विचार करतोय. आणि त्याचे उमेदवार सगळे यंग आणि सुशिक्षित दिसतायत..."
प्रसंग चार
स्थळ : दुर्गा, गूड लक, एस. एम. जोशी ब्रिज, किंवा जिथे आपण खरोखरच बौद्धिक गप्पा मारतो असं प्रत्येकाला वाटतं ती जागा - एखादा बार
वेळ : चार मित्र एकत्र येतील ती (थोडक्यात पुण्यातली कोणतीही)
विषय आता जो बोलल्याशिवाय दिवस निघत नाही तो - अर्थात राज ठाकरे
"अरे इच्छा असणं आणि वस्तुस्थिती यात खूप फरक असतो रे. आता मला ही वाटतं की राजचे उमेदवार निवडून यावेत. पण सालं पॉलिटिक्स किती खराब असतं, तुला माहित नाही का? जास्तीत जास्त पाच, त्यापुढे मनसे ला एक जरी सीट मिळाली तरी मी काही पण हरेन..."
प्रसंग पाच
स्थळ : दुर्गा, गूड लक, एस. एम. जोशी ब्रिज, किंवा जिथे आपण खरोखरच बौद्धिक गप्पा मारतो असं प्रत्येकाला वाटतं ती जागा - एखादा बार
वेळ : २२ तारखेची संध्याकाळ
विषय आज ज्याविषयी बोललं नाही तर आपण चंद्रावर रहातोय असं वाटावं इतका अनिवार्य - अर्थात(च) राज ठाकरे
"बास! राजनी करून दाखवलं यार! जाहिरपणे सांगून दाखवलं १२ सीट्स मिळ्वणार, १३ मिळवून दाखवल्या! याला म्हण्तात कॉन्फिडन्स! शब्दाला जागणारा माणूस आहे यार."
वेगवेगळ्या वेळी, प्रसंगी राज ठाकरेविषयी ऐकलेल्या या प्रतिक्रिया राजची आजच्या सुशिक्षित तरुणाच्या मनातली छबी स्पष्ट करायला पुरेशा आहेत. राज ठाकरे आपल्यासाठी झगडतोय, आपले प्रश्न मांडतोय असं आम्हाला का वाटतय ? याचं उत्तर शोधलं तर उध्दव ठाकरेंच्या मराठी तरुणाला आपल्याकडे खेचण्यात आलेल्या अपयशात मिळतं. आमच्या पिढीनी बाळासाहेब ठाकरेंचा करिष्मा प्रत्यक्ष पाहिला नाही. त्यांच्या लाख-लाख गर्दी खेचणार्या त्यांच्या वक्त्रुत्वाची जादू आम्हाला थेट अनुभवायला मिळाली नाही. पण बाबांकडून, त्यांच्या मित्रांकडून, शिक्षकांकडून मराठीच्या मुद्यावरून त्यांनी छेडलेल्या आंदोलनांविषयी ऐकलं होतं. आज जागतिकिकरणाच्या काळात असं मानलं गेलं की आजच्या मराठी तरुणाला मराठी आस्मितेच्या मुद्यावरून सक्रिय करता येणार नाही. त्याला केवळ चांगलं शिक्षण हवंय. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी हवीय. जमलंच तर ग्रीन कार्ड घेऊन डॉलर्स कमवायचेत. मराठी संस्क्रुती वगैरे, भाषा, आस्मिता त्याच्यासाथी कालबाह्य मुद्दे झालेत. मराठी आस्मिता हा फक्त निवडणुका आणि वक्त्रुत्व स्पर्धांपुरता बोलायचा विषय राहिलाय. मराठी गाण्यांपेक्षा इंग्रजी गाणी ऐकायला त्यांना जास्त आवडतात वगैरे वगैरे...
पण वस्तुस्थिती थोडीशी वेगळी होती. हा मुद्दा उचलून धरायला तेवढा प्रभावी नेता महाराष्ट्रात समोर दिसत नव्हता. दुधाची तहान ताकावर भागवावी तशी बाळासाहेबांचे जुने व्हिडिओज यू- ट्यूब वर बघितले जात होते. बाळासाहेबांची आक्रमकता ही जशी नैसर्गिक वाटत होती, जी तळमळ त्यांच्या शब्दातून जाणवत होती ती उद्धव ठाकरेंच्या शब्दातून कधी जाणवलीच नाही. शब्दही तेच होते, भाषाही तीच होती पण बाळासाहेबांचे शब्द हे एखाद्या वाघाच्या डरकळीसारखे भासायचे, तेच शब्द उद्धव ठाकरेंच्या मुखातून ऐकणं म्हणजे वाघाची कातडी पांघरलेल्या खोट्या प्राण्यासारखे भासायचे.
उध्दव ठाकरेंनी गमावलेला हाच आपलेपणा मराठी तरुणाला राजमध्ये गवसला. तीच देहबोली, तीच आक्रमकता, तीच प्रभावी वक्त्रुत्वशैली राजमध्ये दिसली. शेवटी जागतिकिकरण वगैरे काहीही असले तरी मातीशी जोडलेली नाळ काही इतक्या सहजासहजी तुटत नाही. माझ्या शहरात राहूनही मला रिक्षावाला, भाजीवाला यांच्याशी माझ्या भाषेत बोलता येत नाही हा सल मनात कुठेतरी खदखदतच होता. दक्षिणेकडच्या राज्यात तिथली मायबोली चालते, कोलकातासारख्या मेट्रो सिटीमध्ये बंगालीच बोलली जाते, तर मुंबईत मराठी का नाही? एका प्रतिष्ठित रेडिओ स्टेशनच्या वर्कशॉपमध्ये सांगितलं गेल होतं "लोकल कनेक्ट्साठी ज्या ता शहराची भाषा बोलली गेली पाहिजे. जसं कोल॑कात्यात बंगाली, चेन्नईत तमिळ आणि मुंबईत हिंदी..." कितीही कॉस्मो कल्चरमधून आला असला तरी मराठी माणसाला हे विधान खटकणारच होते. अशाच एका रेडिओ सर्व्हेमध्ये 'मराठी गाणी ऐकत नसलो, तरी ती वाजवणार्या रेडिओ स्टेशनचा अभिमान वाटतो', अशीच बहुसंख्य मराठी तरुणांची प्रतिक्रिया होती पण अर्थात सर्वसामान्य मराठी माणूस पडला 'टिपिकल मध्यमवर्गीय.' शिवाजी जन्माला यावा, पण तो शेजारच्या घरात, या मनोव्रुत्तीचा. मग हा असंतोष रस्त्यावर उतरला नाही, म्हणून तो नव्हताच, असं समजण्याची चूक बहुतेक राजकीय पक्षांनी केली. मात्र याच मनात खदखदणार्या असंतोषाला वाचा फोडली ती राज ठाकरेनी.
आता मराठीचा मुद्दा राजनी केवळ राजकारणासाठी उचलला आहे का खरोखरच त्याला तळमळ वाटते? मनसेच्या उग्र आणि हिंसक आंदोलनांची खरोखरच गरज होती का, तो केवळ पब्लिसिटी स्टंट होता? राज जे बोलतो ते सत्ता मिळवल्यावर खरोखरचकरून दाखवणार का इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच सत्ता मिळवल्यावर तोंड फिरवणार? या मुद्यांवर मतभिन्नता असू शकेल, पण त्याने उचललेले मुद्दे हे मराठी तरुणाला आपले वाटले, हे वास्तव आज राजचे विरोधकही अमान्य करणार नाहीत. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात आलेला भूमीपुत्रांचा मुद्दाही राजचेच कर्त्रुत्व आहे, हे देखील जाहीर सत्य आहे.
राज आमची भाषा बोलतो, आमाला प्रगतीची स्वप्न दाखवतो, प्रसंगी आमच्या मराठी भाषेसाठी अमिताभसारख्या सेलिब्रेटीशीही झगडतो आणि मुख्य म्हणजे तो जे बोलून दाखवतो, ते करण्याची त्याची धमक आहे, हीच राजची प्रतिमा आजच्या मराठी युवकाच्या मनात आहे. अर्थात हाच विचार करून जो तरुण मतदार राजला मतं देऊ शकतो, तोच मतदार अपेक्षाभंगाच्या रागातून राजची धूळधाणही करू शकतो, हे देखील त्याने विसरता कामा नये, हीच आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे. १०० टक्के भुमीपुत्रांना नोकर्या देणे शक्य नाही, हे तर सर्वांनाच मान्य आहे, राजकारणात जरा जास्तच बोलण्याची नेत्यांची व्रुत्तीही जणकार मतदाराला मान्य आहे, पण निदान आश्वासंनांची पूर्तता करण्याच्या दिशेने प्रयत्न तरी होताना दिसायला हवेत... नेमके हेच कोणत्याही राजकीय पुढार्याकडून होताना दिसत नाही. जे चैतन्य राजने तरुण मतदारांमध्ये भरलंय, जी आशा दाखवलीय, त्या दिशेने निदान त्याने प्रयत्न तरी करावेत, हीच राजच्या मतदारांची इच्छा आहे.
ता. क. - निवडणुकीचे वारेही वहात नव्हते, तेव्हा आमच्या सोसायटीतल्या एका टीपीकल कॉन्व्हेंटमधल्या मुलीने (वय वर्ष १४-१५) मला सांगितलं आज मी राजच्या सभेला गेले होते. पटकन एक चिमटा काढून मी जागेपणाची खात्री करून घेतली आणि तिला विचारलं "स्वीटी पण तो जे बोलतो ते तुला पटतं का? त्यातलं मराठी तरी तुला कळतं का?" 'हू केअर्स?' ती पटकन म्हाणाली "पण तो किती क्यूट दिसतो...!"
सौरभ कर्णिक
फोन: ९६०४७८६०९९

No comments:
Post a Comment